खमताने गावाची माहिती
खमताने हे गाव तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिमेस सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आरम नदीच्या तीरावर वसलेले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार खमताने गावाची एकूण लोकसंख्या 2021 असून, त्यापैकी स्त्रिया 967 आणि पुरुष 1054 आहेत. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 1182 हेक्टर आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती असून, शेतीत प्रामुख्याने मका, कांदा, डाळिंब इत्यादी पिकांची लागवड केली जाते.
या गावातील कै. धर्मा तानाजी पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी ब्रिटिश काळात अनेक सत्याग्रहांचे नेतृत्व केले आणि त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना “बागलाण चा सिंह” ही पदवी बहाल करण्यात आली होती. तसेच कै. भिकम जयाजी पाटील हे बागलाण चे पहिले पंचायत समिती सभापती म्हणून विराजमान झाले होते.
गावातील तत्कालीन न्याय मंडळामध्ये कै. नानाजी इंगळे, कै. भिकन जयाजी पाटील, कै. धर्मा तानाजी पाटील, कै. सोनू वेडू इंगळे, आणि कै. नामदेव पुंडलिक बागुल यांनी एकत्र येऊन गावात विविध कार्यकारी सोसायट्या स्थापन केल्या.
दिनांक 17 नोव्हेंबर 1961 रोजी खमताने ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली.